महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आजपासून मिळायला सुरुवात होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १५ फेब्रुवारीला ३५०० कोटी रुपयांच्या धनादेशावर सही केल्याची माहिती दिली होती. त्यांनी सांगितले होते की, पुढील आठवड्यात या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होतील. मात्र, आठवडा उलटूनही पैसे मिळाले नव्हते, त्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. आता महिला व बाल विकास विभागाने सांगितले आहे की, आजपासून या योजनेचे पैसे मिळायला सुरुवात होणार आहे.
लाडकी बहीण योजनेचा हप्ता किती आहे?
या योजनेअंतर्गत महिलांना १५०० रुपये प्रति महिना दिले जातात. जानेवारी महिन्यात २ कोटी ४१ लाख महिलांना ही मदत मिळाली होती. मात्र, अर्जांची पडताळणी झाल्यानंतर साधारण ९ लाख महिलांचे अर्ज बाद झाले, त्यामुळे यावेळी तुलनेने कमी महिलांना पैसे मिळणार आहेत.
महिलांच्या खात्यात पैसे कधी जमा होतील?
महिला व बाल विकास विभागाने सांगितले की, फेब्रुवारी महिन्यासाठी आवश्यक निधी अर्थ खात्याने मंजूर केला आहे आणि लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील. काही तांत्रिक कारणांमुळे पैसे मिळण्यास उशीर झाला होता.
आतापर्यंत किती मदत मिळाली आहे?
या योजनेअंतर्गत ७ हप्त्यांमध्ये १०,५०० रुपये मिळाले आहेत. आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर एकूण मदत १२,००० रुपयांपर्यंत पोहोचेल.
सरकारचे नवीन आश्वासन काय आहे?
महायुती सरकारने सत्तेत परत आल्यास हप्ता २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे महिलांना आता पुढील महिन्यांपासून वाढीव मदत मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.