मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत सुमारे २ कोटी ५१ लाख महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. या योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी लागतो. मात्र, आता संजय गांधी निराधार योजना, नमो शक्ती योजना आणि स्वतःहून लाभ नाकारलेल्या महिलांची संख्या ५ लाख ४० हजारांपर्यंत पोहोचली आहे.
चारचाकी वाहन असलेल्या महिलांची पडताळणी सुरू
सध्या ज्या महिलांच्या नावावर चारचाकी वाहन आहे, त्यांची तपासणी सुरू आहे. त्यामुळे ही पडताळणी पूर्ण होईपर्यंत अशा महिलांना आर्थिक मदत मिळणार नाही. यामुळे काही महिलांना तात्पुरता अडथळा येऊ शकतो.
फेब्रुवारी महिन्याच्या लाभासाठी पात्रतेची तपासणी
विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू करण्यात आली होती आणि अवघ्या अडीच महिन्यांत २.५ कोटी महिलांनी अर्ज केले. मात्र, तालुका व जिल्हा पातळीवर या अर्जांची व्यवस्थित पडताळणी होऊ शकली नाही. निवडणुकीनंतर काही तक्रारी आल्यामुळे सरकारने योजनेंतर्गत अपात्र ठरणाऱ्या महिलांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी तपासणी
सध्या महिलांच्या नावावर असलेल्या चारचाकी वाहनांची पडताळणी केली जात आहे. यासाठी राज्यस्तरावर तयार केलेल्या याद्या अंगणवाडी सेविकांना देण्यात आल्या असून, त्या घरोघरी जाऊन माहिती गोळा करत आहेत.
योजनेतील बदल आणि निर्णयाची प्रतीक्षा
या सर्व तपासणीनंतर अहवाल आठ दिवसांत सरकारकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतर अपात्र ठरलेल्या महिलांसंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईल. पात्र महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळेल, मात्र त्यासाठी मार्च महिना उजाडेल, अशी माहिती मिळाली आहे.
पडताळणीमुळे अन्य योजनेवर परिणाम
सध्या सुरू असलेल्या तपासणीमुळे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचाही लाभ काही काळ थांबला आहे. त्यामुळे काही लाभार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
८२.५० कोटी रुपयांची बचत
आतापर्यंत सुमारे ५.५ लाख महिलांना या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना, नमो शक्ती योजना आणि स्वतःहून लाभ नाकारलेल्या महिलांचा समावेश आहे. तसेच, चारचाकी वाहन किंवा इतर निकषांवर आधारित तपासणीनंतर आणखी काही महिलांना अपात्र ठरवले जाण्याची शक्यता आहे. यामुळे सरकारच्या तिजोरीत ८२.५० कोटी रुपयांची बचत होणार आहे.
महिला लाभार्थींनी अधिकृत यादी तपासावी
जे महिलांना या योजनेचा लाभ मिळतोय का, याची खात्री करायची असेल, त्यांनी अधिकृत यादीत आपले नाव तपासावे. यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन माहिती पाहता येईल.